A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

SATARA MUNICIPAL COUNCIL


About Us


 

स्वराज्य बोर्ड अस्तित्वात आले व म्युनिसिपल कायद्याची अंमलबजावणी १ ऑगस्ट १८५३ पासून सुरू झाली. प्रथमतः कमिश्नर व त्यानंतर कलेक्टर हे अध्यक्ष असत. तिचे शिवाय डेप्युटी कलेक्टर, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, सिव्हील सर्जन, मामलेदार, फौजदार असे अधिकारी तिच्यावर शासननियुक्त सभासद असत. ही १८७३ च्या म्युनिसिपल अ‍ॅक्ट ६ नुसार १८७५ मध्ये टाऊन म्युनिसिपालिटी व मार्च १८८४ मध्ये सिटी म्युनिसिपालिटी झाली. सन १८८२-८३ मध्ये नगरपालिकेचे उत्पन्न ५१,२७० रुपये व खर्च ९३,०८० रूपये होता. स्थानिक स्वराज्य कायद्यात बदल झाल्यामुळे १८८५ पासून निवडणुका घेण्यात येऊ लागल्या. तथापि कलेक्टर अध्यक्ष व त्यांचे मदतनिस बारा शासननियुक्त व बारा लोकनियुक्त असे २५ सभासदांचे बोर्ड अस्तित्वात आले. सातारा कँप हद्दीत पूर्वी मिलिटरी कॅन्टोनमेंट होते. ते बरखास्त झाल्यानंतर तेथील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १८९० मध्ये सातारा सबर्बन म्युनिसिपालिटीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये १२ सदस्य होते. दिनांक १ नोव्हेंबर १९६१ रोजी सातारा सबर्बन नगरपालिकेचे सातारा नगरपालिकेत विलनीकरण होऊन सभासदांची संख्या ४५ झाली. सन १९५७-५८ मध्ये सातारा नगरपालिकेचे उत्पन्न ६,३२,९८७ रुपये व खर्च ८,८४,२८६ रूपये होता. सातारा सबर्बन नगरपालिकेचे १९५८-५९ मधील उत्पन्न ६९, ७४८ रूपये व खर्च ६०,८०६ रूपये होता.

सन १८६६ मध्ये प्रथम घरपट्टी आकारण्यात आली. घरांचे चार वर्ग करून त्यावर सालिना अनुक्रमे रु.८, रु.४, रु. २ व रु. १ या प्रमाणात घरपट्टी बसविली. १८८२ साली वाहने व जनावरांवर कर आकारणी सुरू झाली व १८९३ पासून खाजगी पाणी कर घेण्यास सुरूवात झाली. १८८५ पर्यंत शहरातील सर्व शाळा सरकारी किंवा खाजगी होत्या. दिनांक १ एप्रिल १८८५ रोजी नगरपालिकेने प्राथमिक शिक्षण ताब्यात घेऊन सात मराठी शाळा, एक रात्रीची शाळा व एक मुलींची शाळा सुरु केली. नगरपालिका सभासदांसाठी १८८५ मध्ये पहिली निवडणुक झाली. त्यावेळी पदवीधर, उच्च शासकीय अधिकारी व चार रुपयांपेक्षा जास्त कर भरणा-या नागरिकांना मतदानाचा अधिकार होता. सन १९०९ सालापासून नगरपालिकेस अध्यक्ष निवडण्याचा हक्क मिळाला.

शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नगरपालिकेने १८८६ मध्ये कास तलाव बांधला. इ.स. १९३५ मध्ये या पाणीपुरवठा योजनेत वीज उत्पन्न करण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला. त्यासाठी नगरपालिकेने कर्ज काढून १,८४,००० रुपये खर्च केले व त्यामुळे पाणीपुरवठ्यासह शहरास विजेचा पुरवठा होऊ लागला. सातारा जिल्ह्यासाठी शासनाने १८ नोव्हेंबर १९६३ रोजी नगररचना व विकास योजनांसाठी सातारा येथे नगररचना कार्यालय उघडले. दिनांक १ मे १९८२ पासून ही " अ ” वर्ग नगरपरिषद झाली. नगरपालिकेची अग्निशमन सेवा उपलब्ध आहे. सन १९८८-८९ मध्ये नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांची  एकूण लांबी ७१ किलोमीटर होती. तसेच नगरपालिकेच्या एकूण २५ शाळा व १८९ शिक्षक होते.

सन १९९२-९३ व १९९५-९६ मध्ये नगरपालिकेचे उत्पन्न अनुक्रमे ७,४७,११ व ९,९८,०४ हजार रुपये तर खर्च ६,९३,३७ व ९,७९,८८ हजार रुपये होता. दुरुस्ती अधिनियम, १९९४ नुसार सातारा नगरपरिषदेत निवडून येणा-या सदस्यांची संख्या ३४ असून लोकसंख्येच्या वाढीव निर्बंधामुळे ती आता “ब” वर्गात मोडते.